बुधवार, १ जुलै, २०२०

आठवणीतील पाटील सर !


.जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एस. पाटील सर हे सेवानिवृत्त झाले. ज्या शिक्षकांनी मला आठवी ते दहावी ही तीन वर्षे मला घडवली. त्यामधील पाटील सर हे एक. सरांचा निरोप समारंभ झाला. कोरोनाच्या पाश्वभूमीवर हा समारंभ छोटखानी झाला. मला फोटो आले. आणि मी तब्बल २६ वर्षाचा काळ मी मागे गेलो. १९९६ ला मी दहावी पार केली. आणि पुढील शिक्षणासाठी पुढे आजरा तालुक्याच्या ठिकाणी गेला. १९९४ ते १९९६ हा काळ आयुष्यातील शैक्षणिक आणि महत्वपूर्ण टप्पा.  दिलखुलास शिक्षक म्हणून पाटील सरांची खास ओळख. नेहमी हसतमुख, साधे आणि सरळमार्गी माणूस. गावातील ग्रामपंचायतीच्या जवळच्या जुन्या इमारतीत आमचे शिक्षण झाले. हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात पाय ठेवायच्या अगोदरच मला बहुतांश सर्व शिक्षकांची सुतार सर, घाटगे सर, दिवटे सर यांची ओळख होती. पाटील सर त्याहून अधिक काळापासून म्हणजे हॉटेलात (हॉटेल हा विषय मी कधीतरी पुढे लिहीन) येत असल्याने ते ओळखीचे होते. सर मराठी आणि इतिहास विषय शिकवायचे. मला मराठी विषय आवडायचा पण इतिहास जरा अधिकच डोके खाणारा विषय मला वाटायचा. पाटील सर हे कधीच फळ्याजवळ राहून शिकवत नव्हते. फळ्याचा उपयोग ते फारसे करत नसत. केवळ मराठी व्याकरण शिकवत असतानाच ते फळा वापरत. ते नेहमी सर्व विद्यार्थ्यांवर नजर राहावी या हेतूनच वर्गाच्या बरोवर सुरुवातीच्या टोकावर उभे राहून शिकवायचे. मराठी आणि इतिहास या दोन्ही विषयावर त्यांचा खूप पगडा होता. मराठी विषयात धडा शिकवताना ज्या लेखकाने धडा लिहला आहे. त्या लेखकाची माहिती किंवा व्यक्ती विशेष किंवा अन्य काही अभ्यासाव्यतिरिक्त विषय निघाल्यास अधिकाधिक माहिती आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी ते धडपड करीत. त्यासाठी त्यांचा निम्मा तास गेला तरी ते कधी मागे हटत नसत. विद्यार्थ्यांचे वर्गात लक्ष नाही असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर तर त्याला लगेच ते उभे करत, आपण सांगितेली माहिती ते विचारत. ग्रामीण धडा असो किंवा एखादे व्यक्ती विशेष ते रमून शिकवत असत. कविता शिकवताना तर ते त्या कवितेत ते भान हरपून जायचे. कविता गाऊन शिकविल्या आणि चालीतून शिकविली तर कळते हे त्यांचे कायमचे वाक्य. इतिहास हा विषय कंटाळवाना इतिहासातील घटनांचा अभ्यास, शेकडो, हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असते. त्या सनावळ्या, इतिहास कालीन घटना, काही वेळा धड्यातील एकद्या घटना स्पष्ट नसतात त्या उलगडून काही पुरावे देत आणि गंमती जमंती करत ते शिकवत असत. एकादा धडा शिकवताना अगदीच समोरचे विद्यार्थी कंटाळवाने झाले असतील. ते मध्येच विद्यार्थ्यांच्या नावानेच विनोद करायचे. इतिहासाचे अध्ययन-अध्यापन महत्त्वाचे आहे. असे सांगत ते धड्याचा उलगडा करायचे.
पाटील सर.. तब्बल २६ वर्ष मला वर्गात तुम्ही नेले. बाकावर बसवले आणि आठवणी जाग्या केलात. शैक्षणिक आयुष्य खूप सुंदर आहे. त्या काळात मोठे होण्याची ओढ असते. त्याच काळात तुम्ही शिकवले. घडवले.
अनेकांना तुम्ही शिकवलेल्या विषयाला स्कोरींग मिळाले. काही वर्ष तुम्ही मुख्याध्यापक म्हणूनही शाळेत काम केले.
आता कित्येक वर्षाची सोबत असलेला फळा खडू सोडून तुम्ही निवृत्त झालात. तुमच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा!