आंबेओहळ प्रकल्पाचे घोडे गंगेत न्हाले...
तब्बल ३० वर्षाहून अधिक रेंगाळलेला आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) अखेर मार्गी लागला असे म्हणायला हरकत नाही. जून मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे या प्रकल्पात पाणी साठ्यास सुरुवात झाली याचे समाधान वाटते. तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी हे धरण उभारण्याचे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरले. उत्तूर परिसरील शेतीही पावसावरच, तो पडला की शेती पिकते नाहीतर मग काहीच नाही. हिरण्यकेशी नदी अथवा अन्य कोणत्याही पाण्याचा उपयोग या परिसराला झाला नाही. गेली कित्येक वर्ष या विभागातील सर्वच खेडी पिण्याच्या पाण्यासाठी विंधण विहिरीवरच आहेत. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आंबेओहळ प्रकल्पाचा विचार केला. या प्रकल्पाचे सर्व्हेक्षण सन ८० ते ९० च्या दशकात झाले अशी त्यावेळी चर्चा रंगायची.. कृष्णा खोरे लवाद मंडळाच्या निवाड्यानुसार मंजूर झालेला हा ७ टीएमसी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे त्यावेळी पहायले जायचे. सन २००० सालापासून या प्रकल्पाला गती निर्माण झाली. आंबेओहळची जागा कोणती तर कर्पेवाडीच्या जवळ असलेली नेमकी जागा लोकांना समजली आणि सरकारची वाहने त्या ठिकाणी येवू लागली. या प्रकल्पाने पाणी उपलब्ध होणार असले तरी आठ दहा खेड्यातील चांगल्या प्रतिची जमीन बुडणार असल्याने पहिल्यापासूनच शेतकर्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होता. गेल्या तीन चार वर्षापासून मात्र हा प्रकल्प पुन्हा शासनाने विचारात घेतला. पुनवर्सन आणि सरकारने केलेले दुर्लक्ष यामुळे या प्रकल्पाला विरोध झाला. यामुळे प्रत्यक्षात सुरुवात होण्यास अडचणी आल्या. गेल्या काही वर्षात हा प्रश्न मार्गी लागला.
पोलीस बंदोबस्तात घळभरणी झाली त्यावेळीही शेतकरी व प्रकल्प संघटनेने आंदोलने केली. आता या आणि प्रकल्पात पाणी साठले.. अनेक पुर्नवर्सनाचे प्रश्न अनेक मागे आहेत. शेतकर्यांचा अक्रोश कायम आहे. अजूनही काही शेतकर्यांना मोबदला मिळाला नाही अशा तक्रारी आहेत. प्रकल्पात पाणी साठा झाल्याने उत्तूर आणि गडहिंग्लज परिसर सुजलाम सुफलाम होणार असला तरी जमीन देणारे शेतकर्यांना मात्र वार्यावर सोडू नये हीच अपेक्षा..
....................................................................................................................................................................


