२९ वर्षांनी पुन्हा शाळेत... आठवणींच्या वळणावर एक भावस्पर्शी भेट
कधी वाटायचं – इतकं वर्ष झाल्यावर आपण परत एकत्र जमू का? कुणाला वेळ असेल का? कोणी प्रतिसाद तरी येईल का? पण गेल्या चार महिन्यांत अनेक जणांनी मनापासून घेतलेले कष्ट, ग्रुपमधील चर्चांचे सतत सुरु असलेले थ्रेड्स, अनेकांचे सल्ले देणारे मेसेज – हे सगळं एका सुंदर क्षणात परिपूर्ण झालं. ११ मे २०२५, रविवार – आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल, महागोंड – *१९९५-९६च्या दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर* *. केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर पुन्हा एकदा वर्गातल्या त्या आठवणींनी ओथंबवणारी भेट होती.
नव्या शाळेच्या गेटपाशी पाय ठेवताच सगळं मनातलं थांबून गेलं. जुनी इमारत आठवणीत उभी होती, पण या वेळी तिची केवळ आठवण होती. पण समोर नवीन शाळा होती. स्वागताला असलेली रांगोळी.. त्यानंतर रंगीबेरंगी फुग्यांचे सुंदर आरास.. शाळेत पाय ठेवताच
वर्गाबाहेर मोठा बॅनर झळकत होता – त्यावर आमच्या सगळ्यांची नावं आणि एक जुना रंगीत फोटो – ९ मार्च १९९६ चा निरोप समारंभाचा. तो फोटो पाहून अनेकजण तंद्रीत गेले – कुणी हसत होतं, कुणी आठवणी थांबवू पाहत होतं, तर कुणी नजरेतून भावना व्यक्त करत होतं. हा बॅनर गेट टुगेदरचं एक खास आकर्षण ठरला. त्या बॅनरपाशी उभं राहून वाटलं – त्या काळातील आम्ही! जो तो.. त्यावेळी ओळखीचा पण आता अनोळखी वाटत होता. अनेकांनी त्यासमोर उभं राहून फोटो घेतले, तर काहींनी डोळे मिटून त्या काळातलं स्वतःचं प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न केला. त्या दिवसांपासून आताच्या जबाबदारीच्या टप्प्यापर्यंतचा प्रवास केवळ आठवणींच्या बॅनरवर नव्हे, तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटला होता. एकीकडे काही जण ओळखी बदलून गेले होते. कुणाचे केस गळले, कुणी चेहऱ्यावर आठवणींच्या रेषा घेतल्या – पण हास्याचा आवाज मात्र तसाच होता. २९ वर्षांनंतर, एकूण ३६ सहपाठी – २४ मुले आणि १२ मुली – पुन्हा एकत्र जमलो होतो. २९ वर्षांनी एकत्र आल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होतं.
...कार्यक्रमाचा एक विशेष क्षण म्हणजे "जुन्या आठवणींचा प्रयोग प्रत्यक्षात घडवून आणणं."
कार्यक्रमाची सुरुवातच एक झणझणीत भावनांचा तडका घेऊन झाली. शाळेची घंटा पुन्हा वाजवण्यात आली. त्याचा आवाज ऐकून अनेकजण स्तब्ध झाले. त्या एकाच आवाजाने शाळेतील सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. सर्वांचे स्वागत झाले.
जेव्हा शिक्षक मंचावर आले, तेव्हा बाळाने अगदी मनापासून – आवाज दिला, *" ऑल ऑफ स्टॅंड अप!"* क्षणात सगळे उभे राहिले आणि वर्गभर एकसूरात पुन्हा तो आवाज घुमला: *"गुड मॉर्निंग सर!"*
माजी मुख्याध्यापक एस. के. पाटील सर, सध्याचे मुख्याध्यापक दीपक कांबळे सर, तेव्हाचे वर्गशिक्षक बी. जी. घाटगे सर, एस. एस. पाटील सर, ए. बी. दिवटे सर, आर. एस. सुतार सर सर्वजण क्षणभर स्तब्ध झाले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आश्चर्य आणि एक अनामिक गर्व स्पष्ट दिसत होता. हा क्षण म्हणजे गेट टुगेदरचा सर्वोच्च बिंदू होता – कारण तो 'आठवण' नव्हती, तर 'पुन्हा जगलेली' भावना होती.
नंतर सर्व शिक्षकांचे अगदी संभाने मनभरुन स्वागत केलं. आमचाच वगमित्र नामा आणि आमचे शिक्षक आर. एस. सुतार सर यांनी प्रार्थना घेतली. तेव्हा खूपजणांच्या अंगावर काटा आला. यानंतर प्रास्ताविक मी केले.
शेवटच्या बाकावरील मानसिंग येजरे आज आपल्यात नव्हता. त्याचं निधन झालं. त्याच्यासाठी आणि आपल्या देशासाठी शहिद झालेल्या सैनिक तसेच ज्ञान अज्ञातांसाठी मौन पाळलं. श्रदधांजली वाहिली.
कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सागर सावंतने केलं – आणि त्याने सुरुवात करताच आठवणींचा पूर उसळला. एखादा खोडकर किस्सा, शिक्षकांच्या अनेक आठवणी सांगत त्याने कार्यक्रमाची सूत्र अगदी खिळवून ठेवली. शाळेतील खोड्या, किस्से – एकामागून एक वलय उलगडत गेलं. त्याने आठवणींची अनेक आठवणी उलघडल्या.
या गेट टुगेदरला शिक्षकांची उपस्थिती ही पर्वणी ठरली. माजी मुख्याध्यापक एस. के. पाटील सर, सध्याचे मुख्याध्यापक दीपक कांबळे सर, वर्गशिक्षक बी. जी. घाटगे सर, एस. एस. पाटील सर, ए. बी. दिवटे सर, आर. एस. सुतार सर, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सातु अण्णा, अदिनाथ बुवा, विजय कुंभार सर्वांना मनापासून निमंत्रण दिलं गेलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीने गेट टुगेदरला एक वलय मिळाले. सर्व सरांनी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येकाचे कौतुक केले व नियोजनासाठी सर्वांची पाठ थोपटली..
एस. के पाटील सरांच्या गणिताच्या तासातली शिस्त, पाटील सरांच्या मराठी व्याकरण, दिवटे सर घेत असलेली उजळणी – सगळं पुन्हा चर्चेत आलं. पण या आठवणींमधून केवळ हशा नाही, तर आदरही होता – कारण याच शिकवणीने आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. शाळेच्या आठवणींमध्ये प्रत्येक शिक्षक एकेक अध्याय होता. प्रत्येकाने आम्हाला फक्त विषय शिकवले नाहीत, तर जगण्याची दिशा दिली. सर्वांनीच आपला परिचय करुन दिला यांनतर संभाजी, वैभव, मी, अनिल व प्रत्येकाने आपापले अनुभव शेअर केले. भिकूताईच्या मुलींची शासकीय सेवेतली वाटचाल पाहून अनेकांना अभिमान वाटला. जुन्या सहपाठींची प्रगती, जिद्द, संघर्ष यांचं कौतुक झालं. तो" *ऋणानुबंध मैत्रीचे – २९ वर्षांचे"* अशी स्मृतीचिन्हं देण्यात आली.
दुपारनंतर सर्वजण निसर्ग हॉटेल उत्तूर मध्ये एकत्र जेवणासाठी जमले. महादेवने वाहनाची सोय चांगली केली होती.
सर्वांच्या मनात एक सूर होता – "हे शेवटचं नसावं!"
केवळ फोटो काढणं, मेसेज टाकणं इतपतच मैत्री नको – तर या गेट टुगेदरचं पुढे चालणारं पाऊल व्हावं. शाळेसाठी काही तरी करायचं, काही सुधारणा – आणि दर ३ ते ५ वर्षांनी तरी अशीच भेट ठेवायची, असा ठाम निर्धार झाला.
आणि हो...
सागर, बाळा, अतुल, मुकेश, संभाजी, वैभव, शशिकांत, मानसिंग, धनाजी, निलेश, रत्ना, मनिषा, कविता, अमर, राजाराम, जोतिबा, नामदेव, महादेव – आणि उपस्थित असलेले *सर्वजणच* – यांच्यामुळेच हे शक्य झालं.
*"पुन्हा भेटूया"* एवढंच नव्हे – तर ठरवलं आहे की आता शाळेला शक्य ती मदत करायची, आणि अशाच आठवणींचा सोहळा दर काही वर्षांनी जपायचा.
*-पवन होन्याळकर, १२ मे २०२५*
x

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा