रविवार, २८ जून, २०२०

दिलदार मनाचा मोठा माणूस

माझे मित्र उत्तूर सकाळचे बातमीदार अशोक तोरस्कर यांच्या पत्रकारिता प्रवासाला २५ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने  त्यांच्या विषयी अनेकांनी  मते   'डेटलाईन उत्तूर'  या पुस्तकात व्यक्त केली आहेत. त्या पुस्तकातील त्यांच्या विषयाचा  दिलदार मनाचा मोठा माणूस माझा लेख जसा आहे तसा..

तसं पाहिले तर त्यांच्या आणि माझ्यात वयाचे खूप मोठे अंतर असतानाही त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही. त्यांच्या पत्रकारितेला २५ वर्षे होत आहेत. त्यापैकी २० वर्षे त्यांचा माझा अगदी जवळचा संबंध आहे. मी बातमीदारीचा प्रवास माझे गाव महागोंड त्यानंतर उत्तूर आता मुंबईत असलो तरीही मैत्रीत कधी खंड पडलेला नाही. जशी आहे तशी आजही त्यांनी मैत्री टिकवली आहे. त्यांच्या पत्रकारितेतून प्रेरणा घेऊनच मी पत्रकारितेत आलो. हा प्रवास मांडताना मला थोडं अधिक मागे जावेच लागणार आहे. अकरावी-बारावीचे शिक्षण आजरा येथे घेतल्यानंतर पदवी शिक्षणासाठी मी गडहिंग्लजला अॅडमिशन घेतले आणि त्यामुळे उत्तूरचा संपर्क अधिकच झाला. गडहिंग्लजला जाताना उत्तूरला थांबण व्हायचे आणि त्यातूनच माझा अशोकरावांशी संबंध आला... (ते माझ्यापेक्षा बरेच वर्षानी मोठे आहेत. मात्र आदरार्थी या भावनेने मी अशोकरावच म्हणेन) पत्रकारितेच्या माझ्या पुढील करिअरला दिशा अधिक त्यांनीच दिली. त्यांच्या सोबत राहून ते कसे काम करतात हे मला
अगदी सारखे वाटायचे. पेपरला बातमीसोबत बातमीदाराचे नांव येणे हे माझ्यासाठी खूप अप्रूप असायचे. त्या ओढीने मी अशोकरावांच्या एस.टी.डी.मध्ये जावून बसू लागलो आणि तेथून माझ्या आणि अशोकरावांच्या मैत्रीला प्रारंभ झाला. तो काळ १९९९ चा त्यानंतर मार्च २००० मध्ये सकाळचा महागोंड बातमीदार म्हणून माझी निवड झाली. ते आणि मी अनेकदा स्पर्धक दैनिकात बातमीदारी करत असलो तरी त्यांनी कधी आकस आणि शत्रूत्व ठेवले नाही. नव्या आलेल्या पत्रकारांना पुढे कसे पुढे नेता येईल हे त्यांनी पाहिले. बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलत गेली. नोकरी आणि पुढील पत्रकारिता करियरसाठी मी मुंबईला आलो. तरी त्यांनी माझ्या सोबत जपलेले दायीत्व आजही कायम ठेवले आहे. त्यांच्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी उत्तूर विभागातील घडलेली अनेक स्थित्यंतरे जशी पाहिली, तशीच त्यांच्या पत्रकारितेतील अनेक चढउतारही अनुभवले. त्यांनी मला सुरूवातीला घडवलेल्या पत्रकारितेची प्रेरणा घेऊन मी माझ्या पत्रकारितेतील वाटचाल पुढे चालू ठेवली आहे. बातमीदारीच्या प्रवासातील निगर्वी सोबती म्हणूनच ते आजही आहेत. उत्तूर परिसरातील अनेक प्रश्न आपल्या लेखणीतून मांडणारा दिलदार मनाचा माणूस असेच मी त्यांचे वर्णन करीन. आपल्या लिखानातून अनेक विधायक बाबींना ते नेहमी उजेडात आणतात. त्यांचे प्रत्येक बातमीत वेगळेपण आहे. व्यक्ती निरीक्षण त्यांच्याकडे अफाट आहे. प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण हुबेहुब लेखणीतून मांडणे हे त्यांचे कौशल्य आजही मला भावते. एखादी दुःखद बातमी मोठी देण्यापेक्षा विधायक बाजू मांडणारी बातमी आपल्या वाचकापर्यंत कशी पोहचेल हे ते नेहमी पाहतात. क्राईमच्या बातमीतही ते नेहमी उजवे असत. त्यांचा संपर्क अफाट असल्याने त्यांना परिसरात काय झाले की लगेच त्यांच्यापर्यंत पोहचत. अनेकदा त्यांनी माझ्या वैयक्तीक जीवनात मार्गदर्शकाची भूमिका निभावली आहे.
राजधानी मुंबईत बातमीदार म्हणून काम करताना मला कधी अशोकराव सारखा पुन्हा बातमीदार मित्र भेटला नाही. २० वर्षाचा काळ लोटला असला तरी ते दिवस आजही आठवतात. मानधन शेकड्यात मिळायचे म्हणून त्यांनी अनेकदा मला त्याकाळी अनेकदा धीर दिला. आयुष्यातील कॉलेज करत असताना नोकरी मला त्यांनी त्यांच्या एस.टी.डी.मध्येच दिली. त्यांच्या सोबतीने उत्तूर प
रिसरात तीन वर्षे काम केले. त्यांच्या संपर्कामुळे माझा अधिकचा बातमीदारीतील संपर्क झाला. सध्या मुंबईत असलो तरी अशोकरावाच्या सोबतीने काम केल्यामुळे उत्तूरातील मंडळी आजही ओळखतात. ग्रामीण भागातून आलेल्या बातमीदारांना एक वलय देण्याचे
मोठेपण हे कमी लोकांकडे असते. त्यांच्या सडेतोड, विधायक, सामाजिक बांधिलकी, सत्य आणि संवेदनशील पत्रकारितेमुळेच त्यांचा गेली २५ वर्षे दबदबा आहे तो असाच कायम रहावा हिच शुभेच्छा...!
-पवन होन्याळकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा