रविवार, २१ जून, २०२०

‘फादर्स डे’

‘फादर्स डे’



रविवारी संपूर्ण जगात पितृ दिन अर्थात ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. संपूर्ण आयुष्य स्वत:साठी नव्हे तर कुटुंबासाठी खर्ची घालणाऱ्या वडिलांना सलाम करणारा हा दिवस...पण माझ्यासाठी तर हा खूप वेदना देणारा असाच.. माझे वडील  अण्णा जाऊन  6 वर्ष झाली.  



18 जून 2014 अण्णांना जावून सहा वर्ष झाले... असा एकही दिवस गेला नाही की, अण्णांची आठवण आली नाही. अण्णांना कॅन्सर झाल्याचे त्या वर्षी जानेवारीमध्ये कळले.. त्याच्या या आजाराने अवघे घरच हादरुन गेले. सहा महिन्यातच त्यांच्यावर परळ येथील टाटा मध्ये त्यानंतर कोल्हापूरमख्ये खाजगी रुग्णालय असा प्रवास करीत उपचार झाले. पण यश मिळाले नाही आणि अवघ्या सहा महिन्यात अण्णा गेले. आई एकटी पडली. सारा संसार उघडा पडला, आमच्या कुटुंबासोबत आमचे शेतही पोरके झाले..एक दिवस कधी न घरात राहणारा, नेहमी शेतात काबाडकष्ट करत राहणारा माणूस आमच्यातून निघून गेला. वय वर्ष अगदी 65. ते निघून जाण्याचे वय न्हवते.. अजून।काही वर्षे साथ द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही.
आमच्या कुटूंबातील मी शेंडेफळ,माझ्या अगोदर भाऊ दादा (बाळासाहेब), मोठ्या दोन बहिणी (शोभा आणि गीता) आणि आई हे आमचे पाहिले कुटुंब. आता त्यात सुना (माया,रेश्मा)नातवंडे जावई (राजाराम)कुटूंबाचा मोठा विस्तार झाला, रोहित, राहुल, सौरभ, अथर्व, देवांशू या पाच नातवांत राहणारा माणूस मात्र अथर्व, देवांशू मुले मोठी होण्याअगोदर गेले, याची खंत अजून मनाला बोचते..
जाताना अण्णा मला न भेटताच गेले.. हे अजूनही माझ्या मनाला बोचत राहते. अण्णा आम्हाला सोडून जायच्या अगोदरच सात दिवसापूर्वी मी त्यांना निरोप घेवून मी मुंबईला आलो होतो त्यानंतर अण्णांची तब्येत कमी जास्त होत असायची, ऑपरेशन झाले होते त्यानंतरही त्यांना वेदना खूप होत्या. अगोदर दोन दिवस तब्येत खूपच खालावली, खाण पिणे सोडले, असल्याने दादा गावी गेले. त्यामुळे त्यांना तरी अण्णाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अनेक आठवणी ते ठेऊन गेले. शेतात दरवर्षी काम करणारा माणूस पुढील वर्षी नसेल असे कधी वाटले नाही. संसाराचे एक चाख निखळून पडल्यानंतर तो गाडा एक चाकावर चालत नाही, पण तो गाडा एका चाकावर का असेना पण तो हाकायचे काम माझी आई करत आहे. 

अण्णा जुनी मॅट्रिक शिकलेले.अक्षर सुंदर..ते जेवनही सुदर बनवायचे, जेवण बनवण्यासाठी त्यांना परिसरातील खेड्यात मागणी असायची. शेती कामाबरोबर हे कामही ते करायचे, लग्न, साखरपुडा, बारसे आदी विविध प्रोग्राम ना त्यांना जेवण करण्यास बोलावले जायचे. आम्हाला चार भावंडाना वाढवण्यासाठी त्यांनी हॉटेल टाकले, ते उत्तम चालवले.अनेक चांगल्या, वाईट आठवणी मागे ठेवून गेले. आई वडील सोबत कायम असणे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असेल असे नाही, पण काही मुल मोठी झाल्यानंतर त्यांच्याकाही
काळापर्यंत तरी त्यांची सोबत असणं खुप गरजेचे, आयुष्यच्या सुख दुःखाच्या प्रसंगी त्यांची सोबत महत्वाची असते.
अण्णा घरी कमी शेतात जास्त, अजूनही घरी गेल्यानंतर अण्णा शेतात असेल अशी कुठेतरी वाटते..पण अण्णा शेतात नाही, शेतात यावर्षी काम करणारा माणूस पुढील वर्षी नसेल असे कधी त्यावेळी वाटले नाही. उभे शेत बोडके होऊन बघत राहते, अनेक आठवणी ताज्या होऊन समोर नाचू लागतात. त्यांच्या प्रयत्नाने शेतात ट्रॅक्टर जाणारा रस्ता झाला. ज्या रस्त्यामुळे धड चालता येत न्हवते त्या वाटेत आज शेताच्या बांधावर ट्रॅक्टर जातंय, आम्हाला कधी वाटले न्हवते या शेतातील भात ट्रॅक्टरने नेऊ, पण गेली चार वर्षे शेतात ट्रॅक्टर जाते. ते त्यांनी केलेल्या प्रयत्नाने.. आशा अनेक आठवणी त्याच्या नेहमी सहवास होत राहतात.

त्यांच्या अनेक इच्छा मागे राहिल्यात.. त्या पूर्ण करण्यास ईश्वर आम्हा कुटुंबाना बळ देवो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा