गावड्याचा आंबा...
शेताकडे जाताना वडाच्या माळावरून, देसाईच्या मोळाच्या विहिरीवरून आणि पाटलाच्या पडीवरून जरा वर आलो की नजर आपोआप ऐनाडीच्या दिशेने वळायची. त्या नजरेला सर्वात आधी दिसायचा तो डेरेदार, हिरवागार आणि रुबाबदार गावड्याचा आंबा. आज तो तिथे नाही; पण माझ्या स्मृतींच्या शिवारात तो अजूनही तितक्याच दिमाखात उभा आहे.
१९९० च्या दशकात आमचं बालपण ज्या काही गोष्टींनी घडवलं, त्यात या आंब्याचा मोठा वाटा आहे. बापू आणि आंबाजी पाटील (गावडे) यांचं एकत्र कुटुंब असताना ऐनाडीतील त्यांचं शेत माझे वडील आण्णा यांनीच केलं होतं. त्यामुळे लहानपणापासून आण्णाच्या मागोमाग त्या शेतात जाणं, भूईमुगाच्या शेंगा तोडणं, कोळपा ओढणं, पेरणीची कामं करणं, भाताच्या ओफ्यात राबणं हे सगळं आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं होतं. त्या काळी शेत म्हणजे फक्त जमीन नव्हती ; ती आमची शाळा होती, खेळाचं मैदान होतं आणि आयुष्याचे धडे देणारं विद्यापीठही होतं.
खरं सांगायचं तर त्या परिसराची ओळखच तो होता. दूरवरून आंबा दिसला की आपण योग्य वाटेवर आहोत, याची खात्री वाटायची. पिकं बदलायची, माणसं बदलायची, ऋतू बदलायचे; पण त्याने कधी आपली सेवा बदलली नाही. उन्हातान्हात राबणाऱ्या प्रत्येकासाठी तो कायम तसाच उभा राहिला.
विशेष म्हणजे त्याला फारसे चांगले आंबे लागायचे नाहीत. त्याच्या फळांसाठी कोणी त्याची आठवण काढत नव्हतं. पण त्याच्या सावलीवर मात्र संपूर्ण रान जीवापाड प्रेम करायचं. दुपारच्या कडक उन्हात भाकरीचा तुकडा खाण्यासाठी शेतकरी त्याच्याखाली यायचे. बैलांना बांधायचं असेल, म्हशींना विसावा द्यायचा असेल किंवा कामाच्या थकव्याने अंग शिणलं असेल, तर त्या सगळ्यांचा आसरा तोच. त्याच्या बुंध्याला टेकून घेतलेली डुलकी म्हणजे एखाद्या राजवाड्यातील विश्रांतीपेक्षा कमी नव्हती.
माझ्यासाठी तर त्या झाडाचं महत्त्व आणखी वेगळं होतं. १९९५ ते १९९८ या काळात दहावी आणि बारावीचा बराचसा अभ्यास मी त्याच सावलीत बसून केला. दादानेही त्याची दहावी त्याच झाडाखाली अभ्यास करून पूर्ण केली होती. त्यामुळे कदाचित आम्हाला तो आंबा लकी वाटायचा. पुस्तकं घेऊन जायचं, थोडा अभ्यास करायचा, कंटाळा आला की वरच्या पानांतून दिसणाऱ्या आकाशाकडे बघत बसायचं. कधी डोळे मिटले की बुंध्याला टेकून तासभर झोपून जायचं आणि पुन्हा उठून अभ्यास सुरू करायचा. आजच्या मुलांना वातानुकूलित अभ्यासिका मिळतात; आम्हाला त्या काळी गावड्याच्या आंब्याची सावली मिळाली होती. तीच आमची लायब्ररी होती, तीच आमची अभ्यासिका होती.
त्या आंब्याखाली फक्त अभ्यासच झाला नाही; तर आयुष्यही घडलं. शेतात राबणाऱ्या माणसांचं कष्टमय जगणं तिथेच पाहिलं. उन्हाची झळ काय असते, घामाची किंमत काय असते आणि माणसाच्या श्रमात किती मोठेपण असतं, हे नकळत तिथेच शिकायला मिळालं. कदाचित म्हणूनच त्या झाडाबद्दलच्या आठवणी मनात इतक्या खोलवर रुजल्या असाव्यात.
काळ पुढे सरकत गेला. कुटुंबांची समीकरणं बदलली. शेतांशी असलेलं नातंही हळूहळू सैल होत गेलं. आमचं त्या भागातलं जाणं-येणं कमी झालं. पण त्या आंब्याशी जोडलेला जीवाचा धागा मात्र कधी तुटला नाही. जेव्हा केव्हा त्या वाटेने जायचो, तेव्हा नजर आपोआप त्याच्याकडे वळायची.
मग एक दिवस तोही गेला..आज शेतं तीच दिसतात, वाटा त्याच दिसतात, वारा तसाच वाहताना जाणवतो; पण काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. आण्णा गेला आणि शेत बोडकं झालं, अशी भावना मनात वारंवार येते. खरं तर फक्त आण्णाच गेला नाही; त्याच्यासोबत एका काळाच निघून गेला. त्या काळात गावड्याचा आंबा होता, ऐनाडी होती, लक्ष्मीची रांग होती. शेतात दिवसभर राबणारी माणसं होती. जगण्याला एक साधेपणा होता आणि नात्यांना एक ऊब होती.
आज त्या जागेकडे पाहिलं की झाड दिसत नाही. पण त्या रिकाम्या जागेतही मला त्याची सावली दिसते. त्याचा भला मोठा बुंधा दिसतो. त्याखाली भाकरी खात बसलेली माणसं दिसतात. उन्हातून दमलेले बैल दिसतात. शेजारच्या पाझर तलावाच्या कामासाठी आलेली माणसं दिसतात. पुस्तक हातात घेऊन बसलेला माझा लहानपणीचा चेहराही दिसतो.
नोकरीच्या निमित्ताने मुंबई गाठली. गाव मागे राहिलं. आयुष्याच्या धावपळीत अनेक गोष्टी बदलल्या. पण काही आठवणी अशा असतात की त्या आपला पाठलाग कधीच सोडत नाहीत. गावड्याचा आंबा ही त्यापैकीच एक आठवण आहे.
रानातून जाताना आजही नकळत नजर त्या दिशेने जाते. क्षणभर वाटतं, त्या हिरव्या गर्द सावलीत आण्णा बसला आहे... आई भाकरीची घडी उघडते आहे... आणि मी पुन्हा एकदा बालपणाच्या त्या दिवसांत हरवून गेलो आहे.
झाडं मरतात, माणसंही निघून जातात. पण काही सावल्या कधीच संपत नाहीत. त्या आठवणींच्या रूपाने आयुष्यभर आपल्या सोबत चालत राहतात.
गावड्याचा आंबा माझ्यासाठी केवळ एक झाड नव्हता; तो माझ्या बालपणाचा मुक साक्षीदार होता. माझ्या आयुष्यातल्या असंख्य क्षणांना त्याने सावली दिली, आसरा दिला. काळाने ते झाड हिरावून घेतलं, पण त्याची सावली अजूनही माझ्या मनावर तशीच पसरलेली आहे.
आणि कदाचित म्हणूनच, डोळे मिटले की आजही मला दूर ऐनाडीच्या दिशेला तो डेरेदार आंबा दिसतो... ताठ उभा... शांत... संयमी... माझ्या बालपणावर प्रेमाने सावली धरून.
काही झाडं रानात उभी असतात, तर काही मनात. गावड्याचा आंबा आता रानात नाही; पण माझ्या मनात तो अजूनही जिवंत आहे.
-पवन होन्याळकर
















