२२ मार्चला मी ऑफीसला गेल्यानंतर पुन्हा ऑफीसला गेलो नाही. सर्व काही वर्क फ्रॉम होम सुरुच होते. मार्च, एप्रिल महिन्यात घरात लागणारे सामान खरेदी. कधी कामानिमित्त सोसायटीच्या ऑफीसमध्ये इतकाच काही तो माझा बाहेरचा संपर्क. मला कोरोनाची लागण होईल हे मला कधी वाटलेच नव्हते. हा आजारच कसा कुणाला गाठेल ही कल्पना करु शकणार नाही. त्याने मला हेरलंच. मी मानसरोवर (कामोठे) येथे राहत असल्याने या भागात रुग्णांची संख्या अधिकच होती. दिवसागणिक आकडा हा वाढतोय ते अजून चालूच आहे. दररोज १० हून अधिक रुग्ण या परिसरात सापडतात ते मुंबई व इतर ठिकाणी कामावर गेलेले. मी राहतो त्या सोसायटीच्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये मुंबईला कामानिमित्त जाणारे रुग्ण सापडतच होते. २५ मे या दिवशी माझ्या सोसायटीमधील दोघेजण पॉझीटीव्ह निघाले. पण त्यांचे आणि माझे वयक्तीक संबध चांगले पण या काळात थेट त्यांच्याशी संपर्क आला नाही. त्यांचे खासगी चाचणीत रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे मला कळल्यावर पनवेल पालिका प्रशासनाची बोलून त्यांना उपचार कसे व्यवस्थित मिळतील यासाठी मी त्या दिवशी बिल्डींगच्या खाली उतरलो. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार त्यांच्यासाठी काय सोय होईल. त्यांना लवकर उपचार कसे मिळतील यासाठी प्रयत्न होता. पालिकेचे कोणी कर्मचारी आले तर त्यांना सांगण्यासाठी मी तिथे होतो.दुपारचे १२.३३ झाले होते. पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाची रुग्णवाहिका आल्या. ज्यांना लागन झाली आहे. उपचारासाठी घेवून गेले. घरच्यांना इंडिया बुल्स मध्ये कॉरटाईंन केले. त्याच दिवशी (२५ मे) रात्री अचानक मला कणकण आली. रात्री ताप भरला. मी पॅरोसीटीमॉल घेतली आणि झोपलो. दुसर्या दिवशी मी सकाळी मंगळवार होता. तर कामोठे आरोग्य विभागाचे डॉ. संदीप पाटील यांना फोन केला. तर त्यांना मला सांगितले आरोग्य केंद्रात या. आरोग्य केंद्रावर त्यांनी मला आता तापाच्या आणि सर्दी खोकला टॅबलेट आदी सिरप दिले. ते बोलले हे औषध चालू करा.. काळजी करु नका थोडे व्हायरल असेल. त्यांना बोललो. आमच्या सोसायटीत दोघे काल सापडले आहेत. पण त्यांचा माझ्याशी थेट संपर्क आला नाही. डॉक्टर पाटील बोलले त्याचा काही संबध नाही. परिणाम लगेच होत नाही. पटकन ताप येणार नाही. तुम्ही काळजी करु नका वातावरण बदलले आहे. याचाही परिणाम असेल. मी त्या दिवशी ऑफीसला चार बातम्या पाठवल्या. परत त्या रात्री थोडी कणकण होतीच पण मी टॅबलेट घेवून झोपलो. बुधवारी (२७ मे) सकाळी मला थोडे बरे वाटले. मी नेहमी प्रमाणे दिवसभर काम केले. त्या दिवशी दिवसभरात घडामोडी जास्त होत्या. मी सात बातम्या ऑफिसला पाठवल्या. परत रात्री १०० ताप भरला. मी त्यावेळी मात्र घाबरलो. गुरुवारी डॉ. पाटील यांना परत कॉल केला. सर ताप काही कमी नाही आपण टेस्ट करुया का? ते बोलले पालिकेच्या वतीने करायची झाल्यास तुम्हाला इंडिया बुल्स मध्ये कॉरटटाईन व्हावे लागेल तीन दिवस जातील. तुम्ही अगोदर CBC, WITH ESR टेस्ट करा. ताप कसा येतो हे त्यांनी विचारले. मी म्हटले. मला थंडी वाजून ताप येत होता. मलेरिया टेस्ट करुन पाहूया. असे बोलले. तीही टेस्ट मी केली. तो रिपोर्ट संध्याकाळी आल्यानंतर नॉर्मल आला. मलेरियाही नाही. त्यामुळे पुन्हा चिंतेत पडलो. त्याच रात्री मात्र खूपच ताप आला होता. तापाची टॅबलेट मी त्याच रात्री दोन वेळा खाली तरी ताप कमी आला नाही. अखेर सकाळी मी डॉक्टरांना फोन केला. मी आता थांबू नाही शकत कोरोनाची टेस्ट करुया. मला काही केल्या ताप कमी येत नाही. चार दिवस ताप येत होता जात होता. या दिवसात केवळ तापच होता. बाकी मला ना सर्दी, ना खोकला किंवा चव न जाणे असे काहीही नव्हतेच. याचवेळी मी माझे मित्र डॉ. निकम सर यांच्याशी संपर्क साधला त्यांनाही मी सीबीसी रिपोर्ट पाठवला. त्यांनी मला तापाच्या गोळ्या बदलून टॅब दिल्या. तरीही ताप उतरच नव्हता ताप कमी येत नाहीत तर पवन तू टेस्ट कर. त्याच गुरुवारी रात्री मी निर्णय घेतला की आता बस उद्या शुक्रवारी टेस्ट करायची. सहसा मला फारसा ताप कधी येत नाही. दहा वर्षापूर्वी २०१० मध्ये मला कावीळ झाली होती. पण त्या भयंकर कावीळला मी तोंड दिले होते. त्यावेळी मला ताप आला होता. त्यानंतर मला कधी ताप आला हे आठवत नाही. सर्दी, खोकला असायचा पण कधी ताप फिरकला नाही. पण या आठ दिवसाच्या काळात तापाने चक्क मी गळून पडलो.
- रिपोर्टची प्रतिक्षा जीवघेणी
मी त्रासदायक तापाने अगोदरच वैतागलो होतो. जी मनात गेले पाच दिवस भिती घर करुन होती. ती कोरोना टेस्ट करावी लागणार होती. अनेकांनी सल्ला दिला की ताप कमी येईल. टेस्ट नको. तूला कोरोना नाही. जो काही त्रास गेले सहा दिवस होत होता. ते माझे मलाच माहित. मेट्रो पॉलिसीचा प्रतिनिधी घरी आला त्याने माझे स्वॅब दुपारी १२.३० वाजता शुक्रवारी (२९ मे) रोजी नेले. शनिवारी संध्याकाळी तुमचा रिपोर्ट येईल असे सांगितले. आता रिपोर्टची वाट पाहणे आणि आलेला ताप घालवणे इतकेच माझ्या हाती होते. शनिवारचा संध्याकाळ गेला रिपोर्ट काही आला नाही. रविवारी सकाळी त्या प्रतिनिधिला फोन केला. सर रविवारी सकाळी येईल. रविवारी सकाळी केला. संध्याकाळी येईल. या जीवघेण्या प्रतिक्षेने मी हैराण झालो. या काळात तापाबरोबर मला मेट्रो पॉलिसीच्या यंत्रणेने मला खूप त्रास दिला. माझा रिपोर्ट येत नव्हता. का येत नाही याचे नेमके कारण सांगितले जात नव्हते. अंगात १०१ ताप, रिपोर्टची प्रतिक्षा, घरी पत्नी रेश्मा, ९ वर्षाचा लहान मुलगा देवांशू हे माझ्या जवळच असायचे यामुळे मला अधिकच टेन्शन आले होते. रिपोर्ट कधी येईल मला उपचार कधी सुरु होतील. ताप कधी कमी येईल. हीच चिंता लागून राहिली होती. सोमवारी सकाळी मला मेट्रो पॉलिसीकडून कॉल आला. काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे तुमचा रिपोट दोन दिवस पुढे जाईल. याचवेळी त्यांची आणि माझी खूप बाचाबाची झाली. तुम्ही अगोदर सांगितले पाहिजे होते. तसेच माझा भाऊ बाळासाहेब , साडू देवरकर दादा, मित्र पंकज बाबर यांनीही मेट्रो पॉलिसी वाल्यांनाही कॉल करुन हैरान केले. सोमवारी १ जून रोजी अशी अवस्था होती की, इकीकडे ताप आणि दुसरीकडे रिपोर्ट नाही. खाजगी रुग्णालयात चौकशी केली तर कोरोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर उपचार करु. त्या दिवशी मला थोडा खोकला पण येवू लागला. जीवघेणी अवस्था होती. या काळात सोसायटीतील अनेकांनी आधार दिला. सर्वांना माझा रिपोर्ट कधी येणार हीच चिंता होती. मेट्रो पॉलिसीने आपल्याला दगा दिला. त्यांच्याशी भांडण करुनही तथ्य नाही. आता आपल्याला या संकटातून बाहेर यावे यासाठी प्रयत्न करावे लागणार असेच मला वाटले. ताप कमी येवू दे म्हणून अखंड देवाचा धावा सुरुच होता. लोकमतचा पत्रकार वैभव गायकर यांच्याकडून पनवेल उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. नागनाथ एमपल्ले सर यांचा मी नंबर घेतला. मी त्यांच्याशी बोललो. सर मला गेले सहा दिवस ताप आहे. आणि मी खासगी मध्ये मेट्रो पॉलिसीकडे कोरोना टेस्ट केली आहे. रिपोर्ट अजून चार दिवस झाले आले नाही. काय करु. सर, बोलले तुम्ही काळजी करु नका. उद्या सकाळी ९ वाजता या. तुम्ही येथे संशयित वार्ड मध्ये अॅडमिट व्हा तसेच इथे परत टेस्ट करु या. सकाळी अॅब्लुलन्स घरी येण्यासाठी पनवेल पालिका उपायुक्त शिंदे साहेब यांच्याशीही बोलने करा ते बोलले. मी उपायुक्त संजय शिंदे साहेब यांच्याशी बोललो. त्यानीही तत्काळ पालिकेचे अधिकारी चिमणे यांच्याशी बोलून मला मंगळवारी सकाळी (२ जून) रोजी अॅबुलन्स पाठवत रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. त्यांनी मला दहा दिवसाची कपडे, टूथ पेस्ट, साबण, हॅण्डवॉश आदी घ्या. रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यास तुमच्यावर उपचार सुरु करावे लागतील. त्यामुळे त्या तयारीने या असे सांगत काळजी करु नका असेही उपायुक्त शिंदे साहेबांनी सांगितले. मग मी घरी बॅग भरायला सांगितली. बरे होण्याच्या तयारीनेच निघालो.
- अखेर सायरन वाजलाच
गेले आठ दिवस आमच्या सोसायटीच्या परिसरात कोरोनाचे बरेच रुग्ण आढळले होते. त्यामुळे रुग्णवाहिकेचा सायरन वाजला की मनात एक वेगळीच भिती होती. २ जून रोजी सकाळी मला नेण्यासाठी रुग्णवाहिका येईल असे कधी वाटले नव्हते. पण संकट येतात जातात. आता घाबरायचे नाही. आणि मी बॅग घेवून उतरलो. सोसायटीच्या गेटवर मला आधार देण्यासाठी सोसायटीचे सचिव विष्णू शिंदे, खजिनदार जगदीश रेवाळे आले होते. त्यांनी रुग्णवाहिकेत बसवले. हात करुन आधार दिला. रुग्णवाहिका अखेर सायरन वाजवत रुग्णालयात घेवून जात होती. रस्त्यावरील प्रत्येक माणूस पहात होता. बघत होतो. माझ्या अंगात ताप सकाळीच होता. टॅबलेट घेतली होती. रुग्णवाहिकेत बसल्यानंतर मला डबडबून घाम आला होता. ओला चिंब झालो. रुमालही घामाने भिजला होता. ही बरे होण्याची लक्षणे की भितीपोटी होत आहे असे वाटले. रस्ता मोकळा, त्यामुळे मी १२ मिनिटात रुग्णालयात पोहचलो. त्यावेळी सकाळचे १०.२० झाले होते. रुग्णालयाची पायरी चढतानाच देवाचा धावा केला. सर्व काही सुरळीत कर अशी प्रार्थना केली. संशयित ओपीडीत जावून डॉ. एमपल्ले सरांचे नाव सांगितले. डॉक्टरांनी सर्व माहिती मला होत असलेला त्रास. कधीपासून ताप, किती असतो. तो कधी येतो सर्व काही आदी माहिती घेतली. ११ वाजता संशयित वार्ड मध्ये दाखल केले. त्यांनतर मला एमपल्ले सर स्वतः भेटायला आले. त्यांनी काही आता काळजी करु नका आता रुग्णालयात आला आहेत. इथे परत टेस्ट केली. त्यानंतर १२.३० वाजता माझी पुन्हा रुग्णालयाने कोरोना टेस्ट केली. तो रिपोर्ट शेवटपर्यंत आलाच नाही. दोन वाजता, डाळ, भात, दोन भाजी असे जेवण आले. तापामुळे जेवण जातच नव्हते. सर्व तोंड कडू झाले. कसेतरी दोन घास खाल्ले. त्यांनी दिलेल्या टॅबलेट खाल्या आणि झोपलो. अनेक प्रश्न सतत घोंगावत होते. नको ते विचार डोक्यात शिरत होते. टेस्ट काय येते ही चिंताच होती. या विचारात कधी मला झोप लागली कळले नाही. ४.३० वाजता मी उठलो. पाच वाजता चहा आला. ताप थोडा कमी होता. घाम खूप जात होता. त्यामुळे अंगात थकवा होताच. सात वाजता संध्याकाळचे जेवण आले. भूक नव्हतीच. पण पुन्हा कसेतरी डाळ भात खाला. तोपर्यंत नर्सनी टॅबलेट आणून दिल्या. त्या काळात गावी घरातून आणि सोसायटीतील काही जण ज्यांना माहित झाले ते कॉल करतच होते. ८.३० वाजता बेडवर तसाच फॅनकडे नजर ठेवत पडून होतो. तो पर्यंत
मोबाईलची एसएमएस वाजला. मला वाटलेच रिपोर्ट आला वाटते. त्यानंतर मेलही आला. तो एसएमएस आणि मेल मेट्रोपॉलिसीच्या रिपोर्टचाच होता त्यावेळी रात्रीचे ८.३३ झाले होते.
- मी कोरोना पॉझिटिव्ह
असलेला ताप हा व्हायरल आहे. तुला कोरोना नाही होणार, दुसरा कसला तरी ताप असेल काळजी करु नको. रिपोर्ट निगेटीव्ह येतील हे अनेकांचे समजूतीचे बोल. या समजूतीच्या शब्दामुळेच मी तापाची आठ दिवस सहन केली. शब्दाचा आधार हा किती दणकट असतो हे त्याच काळात कळले. अनेकांचा शब्द आजारपणाला लढा देण्यासाठी प्रवृत्त करत होते. तेच अनेकांचे शब्द मात्र रिपोर्टमधील SARS-COV-2 DETECTED या शब्दांनी सर्व मागे पडले आणि मला अखेर कोरोना झाल्याचे मंगळवारी २ जून रात्री ८.३४. मि. कळले. मी बेडवर गप्प शांत झालो. अगोदरच सर्व विचार करुन मी अगदी मन घट्ट केले होते. मी एकदाच वर पाहिले का कुणास ठाऊक आता लढा द्यायला हवे. मी तातडीने रिपोर्ट रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. यमपल्ले सर, माझा भाऊ बाळासाहेब आणि साडू प्रकाश यांना पाठवला कारण तेच पाठपुरावा गेली चार दिवस रिपोर्ट तातडीने मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. डॉ. यमपल्ले सरांना कॉल केला. सर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्याला पाठवला आहे. ते मला म्हणाले पवन काही काळजी करु नका तुम्हाला कोविड वार्ड मध्ये लगेच शिप्ट करुन उपचार चालू करु. टेन्शन अजिबात घेवू नका. यामुळे अगदीच धीर आला. त्या काळात तो रिपोर्ट घरी समजला. मी तर रुग्णालायत आहे. पण पुढील भिती मुलग्याची आणि मिसेसची होती. कारण मला सात दिवस ताप होता. मी घरातच होतो. त्यामुळे तोच विचार वारंवार येत होता. पवन.. म्हणून जोरात आवाज आला. तर नर्स होत्या. तुम्हाला आता वरच्या वार्डमध्ये शिप्ट केले आहे. जेवण झाले का? मी म्हटले हो. आणि बॅग उचलली. रात्री ९ वाजता मी संशयित वॉर्डातून पॉझिटिव्ह वॉर्डात पहिल्या माळ्यावर दाखल झालो. इथला प्रवेश काही वेळेसाठी शांत करणारा. सर्व लाईट बंद होते. कोपर्यातील एक ट्युब मात्र सुरु होती. वार्ड क्रमांक २९ सलग ओळीने तीन लाइनमध्ये १२ बेड होते. त्यापैकी केवळ दोन बेड रिकामी होते. वर फॅन बघून त्या मोकळा बेड मी ताब्यात घेतला. बेडशीट आणि चादर मला नवीन दिली, इथे वातावरण खूपच वेगळे होत. काहीजण खोकत होते. कुणी जागे होते. बरे वाटत असलेले अनेकजण मोबाईल मध्ये डोके घालून बसले होते. ७५ वर्षाचे घनश्याम (नंतर नाव कळाले) माझ्या बेडच्या पलिकडे एक बेड त्यानंतर ते होते. ७५ वर्षाचा रुग्ण, धड चालता येत नव्हते. पाय ओढत बाथरुमला जाताना तो वार्डमध्ये मी पहिला रुग्ण पाहिला. मी बेडवर सर्व अंथरुन सारखे करत माझी बॅग खाली ठेवली. थोडावेळ बेडवर बसलो. तर तेच घनश्याम आजोबा बाथरुमला जात होते. मी पाहिले. माझे वय ३९. मला कसला इतर आजार नाही. की कोणते व्यसन नाही. पण मी का घाबरतोय. तो पाय ओढत जाणारा माणूस ७५ वर्षाचा तरुण बघ तोंड देतोय. इतकं त्या माणसाने मला कोरोनाची भिती घालवण्यासाठी कोविड वार्ड मध्ये दाखल झाल्यावर पहिल्याच दोन तासात जिद्द तयार केली. रात्री १०.३० वाजता नर्सने माझ्या नावाने मला हाक मारली. चहाच्या कागदी कपात पातळ औषध हातावर ठेवत. जेवण झाले का? मी म्हटले हो. हे घ्या आणि झोपा. तुम्हाला खाली वार्डमध्येच टॅबलेट दिल्या आहेत ना. मी म्हटले त्या मी घेतल्या ८ वाजता. ओके काळजी घ्या म्हणत त्या नर्स निघून गेल्या.रुग्णालयातील पहिला दिवस. ३ जून. त्याच दिवशी वादळ होते. मला सकाळपासून डोस चालू केले. सकासकाळीच अंगात खूप तापच होता. बाहेर वादळ सुरु होते. रुग्णालयातील लाईट वादळामुळे ये-जा करत होती. जनरेटरवर फॅन चालू होते. ते पण कधी कधी बंद होते. याच काळात माझ्या शरिरातही तापाला शह देण्यासाठी वादळ होते. खूप घाम आणि अस्वस्थता ही सुरुच होती. डोळ्यात टॅबलेटमुळे आलेली झोप, मोडून पडलेले अंग, तहाण नाही की भूक अशीच अवस्था शरीराची झाली होती. अशातच पहिला दिवस कधी संपला हे कळलेच नाही. गेले काही दिवस तापामुळे जेवण जात नव्हते. जेवण कर ताकद येईल बरे वाटेल असे अनेकजण सांगायचे. जेवण जात नव्हतेच डोळे बंद करुन पाणी पित घास गिळत होतो. मला बरे वाटावे लवकर यासाठी ही धडपड होती. दुसर्या दिवशीही वादळ होते. ताप होताच. तिसर्या दिवशी आजूबाजूच्या
रुग्णांशी काही प्रमाणात ओळख होत होती. तिथल्या लोकांबद्दल हळुहळू खूपच आपुलकी वाटत जात होती. गुरुवारी डोस पूर्ण झाले आणि शुक्रवारी मला थोडे बरे वाटू लागले. चार घास पोटात जात होते. तापही कमी झाला होता. घामाच्या धारा मात्र सतत चालूच होत्या. या काळात मी अनेक देवांचा धावा केला. त्याचबरोबर माझ्याजवळ तीन पुस्तके होती. ती वाचून काढली. कधी वेळ घालवायचा म्हणून मोबाईल. १२ जणांच्या वार्ड मध्ये दररोज एक दोन रुग्ण नव्याने यायचे तर चार जण बरे होवून जात होते. अनेकांची कहाणी वेगवेगळी असायची. कुणी सरकारी नोकरदार तर कोणी मुंबईला कामाला जाणारा तर कुणाला घरी एकाला झाला होता म्हणून त्याला लागण झालेली. प्रत्येक रुग्णाची कहाणी वेगळीच. कुणी खूप घाबरलेला तर कुणी बिंदास्त. प्रत्येकाला हसून नमस्कार करणे हेच मी कर्तव्य मानले. त्यामुळे समोरच्यालाही बरे वाटत होते. दररोज जेवण होतेच. कधी एक केळ आणि काही वेळा बिस्कीट, कोरोनाशी सामना करण्यासाठी मला जाताना शिंदे
आणि रुग्णालयाच्या गेटवर येवून चंदन शिरवाळे सर यांनी दिलेले सफरचंदही उपयोगी झाले. घशातून काही उतरत नव्हते. त्यावेळी सफरचंद बारीक करुन खाल्ले. मी गरम पाणी किंवा हळद मात्र दररोज सकाळ संध्याकाळ पित होतो. भाचा राहुल, रोहित मी जेवलो की नाही याची दररोज चौकशी करत होते. पण मी आजारी आहे. ही बातमी मात्र कुणालाच गावी माहित नव्हती. गावी घरात आई बहिणीने रडून रात्र काढल्या. व्हिडोओ कॉलवर मी दिसलो की आईच्या डोळ्यातून धारा लागायच्या. मला कोरोना झाला आहे. हे इकडचे तिकडे होवू दिले नाही. आजारपणात वेदना असतात त्याला उपाय म्हणून मेडिसिन तरी असतात. पण घरातील कोण आजारी असले की मात्र त्या वेदना मात्र घरात असलेल्या प्रत्येकाला रात्र रात्र झोप येत नाही. तीच अवस्था माझ्या आजारपणात अनेकांची झाली होती. मिसेस रेश्मा, दादा (बाळासाहेब), वहिनी माया, आई, बहिण (शोभा गीता), भाचे राहुल, रोहित, सौरु, दाजी राजाराम, साडू (प्रकाश, संतोष), मेहुण्या (ललिता, रेणूका), मेहुणा सुशांत, तेजस्वी, सोसायटीतील अध्यक्ष चौगुले फॅमिली, सचिव शिंदे ऑल फॅमिली, रेवाळे फॅमिली, किंजाळकर, चौधरी व भागडे यांच्या फॅमिली, मित्र पंकज बाबर, ऑफीसमधील कार्यकारी संपादक गिरधारी सर, नाईक सर, संजय कदम सर, दिलीप सपाटे सर, उदय तानपाठक सर, चंदन शिरवाळे सर, चेतन, सुरेखा आदी मंडळीनी अनेक बाजूंनी आधार दिला. संजीव भागवत, नीरज, तेजस, सौरभ, विनायक, मनिषा फाळके, राणे मॅडम ही बीटवर सोबत काम करणारे पत्रकार, विद्यापीठ सिनेट सदस्य वैभव थोरात, सुधाकर तांबोळी त्याचबरोबर शिक्षक संघटनेचे जालींदर सरोदे, लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, भादवणचे काका, ढवळे गणपत मामा आदींनीही दररोज कॉल करत आधार दिला. सगळेच काळजीपोटी फोन करत होते. अनेक सल्ले देत होते. अनेकदा नेमके करु काय म्हणत मला कॉलही घ्यायची भिती वाटायची. काहीही झालं तरी या परिस्थितीला तोंड द्यायचे मनात निश्चय केला. रुग्णालायत योगा-प्राणायमला करा असेही सांगितले. तेही चालू केले. भाचा राहुल आणि रोहितने शेतातील अनेक त्या काळात फोटो पाठवले. की फोटो पाहून मी आजारपण विसरुन जावू दे. मला बरे वाटू दे. मंदिरात जावून राहुल व्हिडोओ कॉल करायचा. मामा देवाचे दर्शन घ्या सांगायचा असे करत रुग्णालयातील दहा दिवसापैकी एक एक दिवस कमी होत होता.
- रिपोर्ट निगेटीव्ह आले
माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मुलाची आणि मिसेसचा टेस्ट करणे भाग होते. पण त्यांना काहीच त्रास नसला तरी टेस्ट ही करावी लागणार होती. सात दिवस सलग मला ताप येत होता. पण मी त्या काळात मास्कही वापरला नाही. मला हव नको ते मिसेस पहात होती. मुलग्याला मात्र लांब ठेवले होते. दोन दिवसाच्या वादळामुळे त्यांची टेस्ट दोन दिवस लांबली. शुक्रवारी (५ जून) वटपौणिमा होती. त्यांना पनवेल जिल्हा रुग्णालायत बोलवले आणि टेस्ट केल्या. सोमवार (८ जून) रोजी रुग्णालयात माझा ताप कमी झाला होता. मला बरे वाटू लागले होते. तो दिलासादायक दिवस होता. त्या दिवशी मिसेस आणि मुलाचाही टेस्ट रिपोर्टही येणार होता. मला भिती होती ती की मला झाला. त्यांना काय होईल यामुळे दडपण होते. ज्या मॅडमनी स्वॅबसाठी बोलवले होते. त्या श्वेता मॅडमना मी दुपारी १२.४८ वाजता मी कॉल केला. मी पवन बोलतोय मॅडम, पवन बोलताय ना.. अहो मी तुम्हालाच कॉल करणार होते. देवांशू आणि रेश्मा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मी अगदी समाधानाने देवाचे हात जोडले. मग सर्वांना सांगितले. असंख्य प्रश्नांनी डोकं गेली काही दिवस गरगरत होतं. त्यामधील एक प्रश्न निकामी झाला. मग मी तिथेच ठरवले की, आता ताण घ्यायचा नाही सर्व काही चांगले होईल.
..
- अखेर कोरोनाला हरवले..
मिसेस आणि मुलाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने मनावरच ८० टक्के ओझे कमी झालेले होते. प्रत्येकाची एक भावना असते. आपल्याला काही झाले तरी चालेल पण घरच्यांना नको तीच भावना माझी पण होती. 14 दिवस माझ्या आजारपणामुळे घरातच त्यांना क्वॉरंटाईन व्हावे लागले. सोसायटीतील कशी वागतील. इतर कसे वागतील हे मनाला बोचत असतेच, पण तसे मला माझ्या सोसायटीत माझ्या कुटुंबाला जाणवू दिले नाही. मला पूर्ण बरे वाटू लागले. तापही पूर्ण कमी होत नाहिसा झाला. पाचव्या दिवशी मला पूर्ण बरे वाटले. पण दहा दिवस रुग्णालयातच राहावे लागणार होते. बुधवारी चेकअप साठी आलेल्या डॉक्टर मॅडमनी सांगितले की, पवन गुरुवारी तुम्हाला डिस्चार्ज आहे. पण तुम्हाला १८ जून पर्यंत घरीच थांबावे लागेल. घरात वावरताना काळजी घ्यावी लागेल. मास्क वापरावा लागेल. यावेळी थोडा मी भावनाविश झालो. आपण आजारी पडलो. बरे झालो. अनेकांचे पाठबळ, देवांची कृपा, आशीर्वाद, बर्याच जणांनी दिलेला धीर यामुळे मी कोरोनाला हरवले. ११ जून रोजी रुग्णालयात दुपारी जेवण झाले, माझ्या हातावर शिक्का मारला. मिसेस आणि मुलाचे रिपोर्टही हाती दिले. माझे डिस्चार्ज कार्डही दिले आणि माझा वार्ड क्रमांक २९ ने टाळ्या वाजवत निरोप दिला. मीही तुमच्यासारखाच
आलो होतो. तुम्ही पण सर्व बरे व्हाल. असे सांगत सर्वाचा निरोप घेतला. पुन्हा टाळ्या वाजल्या. आणि मी रुग्णालायत बाहेर उभे असलेल्या अॅब्युलन्स मध्ये जावून बसलो. माझ्याबरोबर आणखी एक रुग्ण होता. त्याला पनवेलमध्ये सोडले. सोसायटीच्या बाहेर मी आल्यानंतर सोसायटीमधील अनेकजण स्वागत करण्यासाठी उभे होते. स्वागत झाले. घरी आलो. त्यानंतर १८ जून पर्यंत मी क्वॉरंटाईन काळ पूर्ण केला. आलो त्याच दिवशी अनेक विचार मनात नको म्हणून ऑफीसचे काम सुरु केले. बातम्या देण्यास सुरुवात केली. तुमच्या कृपेने मी आता बरा झालो. मी अखेर कोरोनाला हरवले हेच सांगावे लागेल.
-पवन होन्याळकर


अनुभव खुप छान रेखाटला आहे. कोरोनासारख्या महारोगाशी यशस्वी लढा देऊन त्यावर विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन.
उत्तर द्याहटवाअशी अनेक संकट येतातही आणि जातातही. फक्त धैर्याने तोंड द्याव लागत. आपण ते दाखवल म्हणूनच लवकर बरे झालात.कोरोनामुक्त झाल्याबद्धल अभिनंदन आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा..!!
उत्तर द्याहटवा